सेवाभारती पश्चिम महाराष्ट्र विषयी
राष्ट्रीय सेवा भारती ही सेवेच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य सेवा संस्था आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये सेवा भारती तर्फे अनेक सेवाकार्ये चालवली जात आहेत. प्रामुख्याने सेवा वस्त्यांमध्ये सेवा कार्य करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. गेल्या तीस वर्षांपासून हे कार्य देशभरात सुरू आहेत.
अध्ययन, प्रशिक्षण, जागरण-प्रबोधन आणि सहयोग या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि स्वावलंबनाच्या क्षेत्रात सुमारे ४५ हजार सेवाकार्ये देशभरात सेवा भारती तर्फे चालवली जात आहेत.
समाजातील वंचित, अभावग्रस्त, उपेक्षित, पीडितांना आवश्यक साहाय्य करून, त्यांच्यासाठी सेवाकार्य चालवून सुदृढ, सशक्त, शिक्षित आणि समरस समाजनिर्मितीचे आणि त्या माध्यामातून राष्ट्र निर्माणाचे कार्य सेवा भारती करत आहे.
देशात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली तर अशावेळी आवश्यक साहाय्य करण्याचे काम सेवा भारतीने वेळोवेळी अत्यंत तत्परतेने केले आहे.
सेवा भारतीचे हे कार्य अत्यंत निरपेक्ष वृत्तीने आणि सेवेच्या उदात्त भावनेतून सुरू असून संस्थेचे हजारो कार्यकर्ते ही कामे समाजाची सेवा म्हणून करत आहेत.
आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सेवा भारतीतर्फे चालणार्या विविध सेवाकार्यांची ओळख या पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला होईल. समाजातील सज्जनशक्तीकडून मिळणार्या निधीच्या आधारे प. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ५६८ सेवाकार्ये संस्थेतर्फे चालवली जात आहेत. समाज या सेवाकार्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा रहात असल्यामुळेच सेवेच्या क्षेत्रात सेवा भारती लक्षणीय कार्य करत आहे.